
चिपळूण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कृती समितीचे बेमुदत धरणे आंदोलन, राज्यभर सुरू असून, चिपळूणमध्ये आज ता.३ सप्टेंबरला सकाळपासून हे आंदोलन सुरु झाले आहेत. या आंदोलनाची हाक कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने शासनाला आगाऊ देऊनही , त्यांच्या मागण्यांबाबत शासनाला तोडगा काढता न आल्याने, आज हे आंदोलन प्रवाशांच्या माथी मारले गेले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना, कास्ट्राईब एस.टी.कामगार संघटना, बहुजन एस.टी. कामगार संघटना आणि इतरही सर्व संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. चिपळूण डेपोतील सुमारे ५० टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन , बस स्टँडच्या बाहेर थांबलेले आहे. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, प्रशासकीय कार्यालयीन कर्मचारी, वर्कशॉप मधील कर्मचारी आणि इतर सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याने , त्याचा परिणाम प्रवाशी वाहतुकीवर झालेला आहे.
सकाळच्या सत्रातील काही ठराविक मार्गावरील बस सोडण्यात आल्या. तसेच काल गेलेल्या वस्तीच्या बसेस परत आल्या, मात्र त्यानंतर कर्मचारी नसल्याने बसेस सोडणे चिपळूण एस.टी.डेपो प्रशासनाला अवघड जात आहे. पोफळी, खेड, सावर्डे, रत्नागिरी, गुहागर आदी प्रमुख मार्गावरील वाहतूक विलंबाने मात्र, तुरळक प्रमाणात सुरू आहे. मात्र प्रवाशी दोन दोन तासांपेक्षा जास्त काळ बस स्टँडमध्ये खोळंबलेली होते.
पुणे मुंबईसह, कराड- कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या मार्गावर जायला एस.टी.बस उपलब्ध नसल्याने प्रवाशी सकाळपासून बस स्टँडवर ताटकळत होते.
चिपळूण आगार प्रमुख दिपक चव्हाण आणि रत्नागिरी विभागीय कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजू पाथरे यांना कोकणसाद ला, प्रतिक्रिया देताना, ६० ते ६५ टक्के कर्मचारी कामावर हजर असून, प्रवाशांची.गैरसोय होणार नाही , याची आम्ही काळजी घेत आहोत. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अडचण होऊ न देता, आवश्यक त्या मार्गावरील, परिस्थिती आणि गरजेनुसार बसेस सोडण्याची व्यवस्था करीत आहोत. तशा सूचनाही वाहतूक नियंत्रण कक्षाला दिलेल्या आहेत.