
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारावे अशी मागणी दोडामार्ग मधील सामाजिक कार्यकर्ते गणपत बाळा जाधव यांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदनही त्यांनी तहसीलदार दोडामार्ग यांना दिले आहे.
दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन २५ वर्षे पूर्ण होत आहेत, तरी हा तालुका आजही दुर्गम भागात येतो, तसेच या तालुक्याचा काही भाग व गावे घाटमाथ्यावर येतात, अश्या परिस्थितीत या समस्यांचा विचार करता या तालुक्यातील मुला-मुलींना शिक्षणासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गरीब, गरजू मागासवर्गीय मुलांना परिस्थिती अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गावातल्या गैरसोयी, हलाखीची परिस्थिती यामुळे या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून तालुक्यातील शिक्षण घेण्याकरिता अनेक मुले-मुली सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवण तसेच इतर ठिकाणी आधार घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. या बाबीची शासनाने गंभीर दखल घेत दोडामार्ग तालुक्यात मागासवर्गीय 'मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह' निर्माण अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
त्यामुळे शासन स्तरावर याचा गंभीर विचार होऊन दोडामार्ग तालुक्यात सर्व सुविधा संपन्न असे मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह उभारण्यात यावे, याकरिता शासनाने आपल्या अखत्यारीत असणारी जागा उपलब्ध करून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा या गंभीर मागणी करिता महिन्याभरानंतर समाजाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे