
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशिर मार्गाचा अवलंब करून विविध कंपन्या स्थापन करून शेतजमिनीची खरेदी व विक्री वाणिज्य वापरासाठी दाखवून शासनाची फसवणूक करणा-या कंपनीची चौकशी करण्याची मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण आंगचेकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनात्मक जिल्हा असल्याने अनेक कंपन्यांनी सन २००० सालापासून शेतकरीवर्गाकडून अत्यल्प दरात वाणिज्य वापरासाठी जमिनी खरेदी केल्या. परंतु, त्या जमिनीवर कोणतीही परवानगी आत्तापर्यंत न घेता तसेच कोणताही वाणिज्य वापर न करता शासनाची फसवणूक केली आहे. जमिन खरेदी करताना लागणा-या सक्षम अधिकारी यांची परवानगी न घेता पर्यटनाच्या नावाखाली जमिनी खरेदी केल्या आहेत. अशा कंपन्यांचा शोध घेण्यात यावा. अशा अनेक कंपन्या सध्या सिधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. तसेच अशा गैरव्यवहारांना सहकार्य करून पाठबळ देणा-या अधिकाऱ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे.