
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणेसाठी तसेच कामगारांना नोंदणी, नूतनीकरण, विविध योजनांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव यांचा शासन स्तरावर आक्रमकपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच कामगारांची एजंटांमार्फत चाललेल्या लूटमारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सात संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे.
सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे बाबल नांदोसकर, श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू बांधकाम कामगार अध्यक्ष संघटनेचे अशोक बावलेकर, निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रसाद गावडे, कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटना (आयटक)चे संतोष तेली, इमारत बांधकाम व असंघटित कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश दळवी आदी संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती असे समितीचे नामकरण करण्यात आले आहे. या समितीची सभा सोमवार 2 सप्टेंबर 2024ला ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदी स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांच्या अस्तित्वाच्या व स्वाभिमानाच्या लढ्यात सात संघटना मतभेद विसरून एकत्र आल्याने कामगार चळवळीला बळ मिळाले आहे, सभेचे प्रास्ताविक बाबल नांदोसकर यांनी मांडले.