
दोडामार्ग : पावसाळ्यामध्ये कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळतात. पोषणाच्या दृष्टीने त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात. त्याचा उपयोग आहारात केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक विपुल प्रमाणात मिळतात. तसेच डायबेटीस नियंत्रित करणारे, पित्तशामक, पित्तनाशक, हिमोग्लोबिनवर्धक व इतर घटक या रानभाज्यातून मिळतात. फास्टफूडच्या जमान्यात रानभाज्यांपासून दूर जाणाऱ्या पिढीला पुन्हा रानभाज्यांची ओळख करून देण्याच्या मुख्य उद्देशाने ल. सी. हळबे महाविद्यालयात हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी साधा कुरडू, रान कुरडू, चरचारा भाजी, कोमचे, तेरे, आळूभाजी, टायकाळा, शेगुलभाजी, सुरणभाजी, लालभाजी व इतर भाज्या व त्यापासून बनवलेले पदार्थ यांचे प्रदर्शन मांडले होते. प्रत्येक भाजीचे बोलीभाषेतील नावे, शास्त्रीय नाव, त्यातील जीवनसत्वे, आणि तिचा आहार शास्त्रानुसार उपयोग इ. बाबींची माहिती चार्ट्सच्या माध्यमातून देण्यात आली. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी हॉस्पिटॅलिटी स्टडीजचे विभागप्रमुख प्रा. रोहन बागकर, प्रा. दर्शनी कोटकर, तसेच डी. एल. एल. इ. चे विस्तार कार्यशिक्षक डॉ. सोपान जाधव व प्रा. भाग्यश्री गवस यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.