दोडामार्गच्या मुख्य चौकात छत्रपतींच्या पुतळ्याची दिमाखात उभारणी !

शिवपुतळ्याला विशाल परब यांची ढोलताशाच्या गजरात मानवंदना
Edited by: संदीप देसाई
Published on: August 31, 2024 15:16 PM
views 215  views

दोडामार्ग : मालवण राजकोट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर धगधगत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिमानास्पद अशी छत्रपती शिवछत्रपतींच्या पूर्णांकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.






 गेल्या वर्षभरापासून दोडामार्ग पिंपळेश्वर मुख्य चौकात सुशोभीकरण करण्यात आलेल्या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळा उभाराणीसाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, त्यांचे सहकारी आणि शिवप्रेमी प्रयत्नशील होते. दोडामार्ग शहरातील उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या मोठ्या सहकार्याने अखेर हे प्रयत्न फळास आले असून शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याची विधिवत स्थापना करण्यात आली. तमाम दोडामार्ग वासियांसाठी  सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातील हा अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत आजचा दिवस हा दोडावर बसण्यासाठी सुवर्ण दिवस असल्याची भावना या सोहळ्यात उपस्थित अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली.




 यावेळी दोडामार्ग शहरातील  शिवप्रेमी नागरिक व मान्यवरांचा अमाप उत्साह पाहता आला. सुरवातीला श्री देव पिंपळेश्वर चरणी साकडे घालण्यात आले. त्यानंतर ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार  व शिव पुतळा उभारणीसाठी अमूल्य योगदान देणारे उद्योजक विवेकानंद नाईक यांनी सपत्नीक शिवरायांच्या पुतळा स्थापनेची पूजाअर्चा केली. त्यानंतर शेकडो उपस्थिताने  शिवरायांची आरती करत छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले. तर यावेळी  ढोल पथकाच्या दणदणाटाने, टाळ्यांच्या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दोडामार्गचे वातावरण शिवमय होऊन गेले. खऱ्या अर्थाने दोडामार्ग शहर आसमंत पुन्हा शिवतेजाने अक्षरश: भारून गेला. 




 उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या  छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याची विधीवत पूजनासह प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोलताशांच्या पथकांनी शिवगर्जनांचा आवाज बुलंद केला. नव्याने स्थापित झालेल्या या शिवपुतळ्याचरणी लीन होत विशाल परब यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या सोहळ्याने दोडामार्गचे वातावरण शिवमय झालेले दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मनामनावर असलेले गारुड आणि त्यांच्या विचारांचे शिवतेज या आसमंतातून कधीही ओसरणार नाही, तमाम शिव भक्तांना हा आनंदाचा क्षण असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. 





यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उद्योजक विशाल परब, उद्योजक विवेकानंद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,  माजी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, ॲड.अनिल निरवडेकर, नगरसेवक तथा बांधकाम सभापती नितिन मणेरीकर, सौ. गौरी पार्सेकर, नगरसेविका सुकन्या पनवेलकर, एकनाथ सावंत, युवा मोर्चाचे पराशर सावंत,  महेश गवस, मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. सोनू गवस, दिवाकर गवस, वक्रतुंड कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, प्रकाश सावंत , सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर, विशाल मणेरीकर, तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दोडामार्गचे युवामित्र आकाश कुबल, गोविंद नाईक,  मनोज वझे, निळकंठ फाटक, निलेश साळगावकर, वैभव इनामदार, सुमंत मणेरीकर दोडामार्ग तालुक्यातील सर्व संघटना पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक आणि दोडामार्ग ग्रामस्थ व शिवभक्त मंडळी यांची प्रचंड संख्येने असलेली उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती.


शिवपुतळ्याला विशाल परब यांनी ढोल ताशांच्या गजरात दिली मानवंदना


छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्राच्या केवळ मनात नव्हे तर रक्तात रुजलेले आहेत. राजकारण करायचं असेल तर ते "स्वराज्या"चे करावे, रयतेच्या हिताचे करावे ही शिकवण देणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आज जे चालले आहे, ते युवकांसाठी प्रेरणादायी निश्चितपणे नाही. शिवछत्रपतींच्या या पुतळ्यापासून आपण सर्व प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा श्रींची इच्छा असलेले रोजगार, शिक्षण, आरोग्य, कला-क्रीडा आणि संस्कृतीचे स्वराज्य पुन्हा निर्माण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.