
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना सावंतवाडी यांच्यावतीने श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सावंतवाडी येथील बॅरिस्टर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून विशाल परब यांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, आज प्रत्येक व्यवसायात विविध आव्हानांचा सामना हा करावाच लागतो. नाभिक समाजाचा व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून सौंदर्य कला यांची उपासना आहे असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही. आपल्या या पारंपरिक व्यवसायात स्थानिक नाभिक बंधू-भगिनीनी आपले वर्चस्व व स्थान अबाधित ठेवले पाहिजे. या व्यवसायात विशेषतः महिला भगिनी यशस्वीपणे आव्हाने पेलत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. नाभिक समाजाच्या व्यवसायात आणि संघटनात्मक कामात काही अडचणी येत असतील तर मी आपणा सर्वांचा प्रामाणिक हितचिंतक म्हणून सदैव आपल्या पाठीशी आहे.
यावेळी हेमंत मराठे, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष सदानंद पवार, उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर, सेक्रेटरी श्रीकांत कोरगावकर, खजिनदार दयानंद वेंगुर्लेकर, नाभिक समाज शहराध्यक्ष सर्वेश्वर होडावडेकर, शहर उपाध्यक्ष चेतन तोरस्कर, युवा अध्यक्ष अक्षय चव्हाण, शांताराम वेतोरेकर आदी नाभिक संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, नाभिक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. श्री संत सेना महाराजांचे पूजन, आरती, भजन, तीर्थप्रसाद या धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, पाककला स्पर्धा, नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमांसह श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम ज्या अतिशय उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला गेला.