
दोडामार्ग : मालवण राजकोट येथे शिवरायांच्या पुतळा कोसळण्याची घटना घडली त्या घटनेचे तीव्र प्रतिसाद दोडामार्ग तालुक्यातही उमटले आहेत. मराठा समाजाच्यावतीने नायब तहसीलदार यांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा शिवप्रेमी कडून भविष्यात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा मराठा महासंघ, शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रेमींनी निवेदना द्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले की अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा मालवण राजकोट येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी घाई गडबडीत उभारण्यात आला होता. अवघे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा भ्रष्ट यंत्रणेमुळे खाली कोसळला, ही बाब अतिशय दुर्देवी आहे. यामुळे अखंड हिंदुस्थानातील शिवप्रेमींच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे. हा पुतळा उभारताना यंत्रणा, अधिकारी व तत्कालीन शासन यांनी नैसर्गिक आपत्ती आणि या संदर्भात सखोल अभ्यास न करता घाई गडबडीत पुतळ्याचे निकृष्ट अशा दर्जाचे काम केले. त्यामुळेच ही दुर्देवी घटना घडली.
संबधित प्रशासनाचे अधिकारी यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कार्यात घोर भ्रष्टाचार केल्यामुळे तसेच संबधित ठेकेदार यांनीही या गोष्टीचे गांभीर्य न ठेपता अधिकाऱ्यांशी संगनमताने स्वार्थापोटी भ्रष्टाचार करुन या पुतळयाची उभारणी केली. त्यामुळे पुतळा अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत कोसळला. त्यामुळे घटनेची तात्काळ चौकशी करुन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन निलंबित करावे आणि संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. ही कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. अन्यथा येत्या काळात दोडामार्ग तालुक्यातील शिवप्रेमींकडून भव्य आंदोलन उभारण्यात येईल असे नमूद केले आहे. यावेळी मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस, सचिव उदय पास्ते, वैभव इनामदार, दिवाकर गवस, उल्हास नाईक, विलास आईर व शिवप्रेमी उपस्थित होते.
महाराजांचा पुतळा ४० किमी प्रति तास वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे कोसळला असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण शिवाजी महाराजांनी अफझलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान तसेच इतर अनेक चक्रीवादळे आपल्या निधड्या छातीवर झेलून त्यांचा चुराडा केला. शिवाय समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे तो पुतळा कोसळल्याचे विधान केल्याने शिवप्रेमींची भावना दुखावण्याचे काम हे सत्ताधारी करत आहेत. भ्रष्टाचाराच्या मार्गाने बसविलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे आम्हा शिवभक्तांवर जबाबदारी सोपवा. आम्ही असा पुतळा उभारू, जो आठ महिनेच काय तर ८०० वर्षाहून अधिक काळ टिकेल. मात्र कोणत्याही राजकारण्याने यापुढे शिवरायांच्या नावावर मत मागू नये असा इशारा ॲड. सोनू गवस यांनी दिला.