मणेरीतील खड्डे भरण्याचं काम सुरु !

Edited by: लवू परब
Published on: August 26, 2024 14:19 PM
views 93  views

दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्यमार्गावर मणेरी येथे पडलेले खड्डे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविण्यास आज सोमवारपासून सुरुवात केली आहे. कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसाद ने यासंदर्भात मणेरीवासियांना घेऊन आवाज उठवला होता. त्यानंतर मणेरी वासियांनी रस्त्यात पडलेले खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा दिला होता. मणेरी वासियांच्या आठ दिवसाच्या या डेडलाईन नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर जाग आली. पडलेले खड्डे अखेर बुजविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्व मणेरीवासियांनी वाहन चालकांनी बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

मणेरी येथे पडलेले खड्डे, चिखलाच्या साम्राज्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. हे पडलेले खड्डे गणेश चतुर्थीच्या अगोदर म्हणजे  25 तारीख पर्यंत बुजवा अन्यथा सर्व ग्रामस्थ तसेच वाहन चालकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे येथील उपसरपंच विशाल परब, युवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस, ग्रामस्थ व युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस, ग्रामस्थ रवी नाईक, सुरज प्रसादी, मधू कुबल, सेनेचे दोडामार्ग शहर प्रमुख योगेश महाले, पाटये सरपंच प्रवीण गवस व ग्रामस्थ वाहन चालकांनी सांगितले होते. 

दोडामार्ग बांदा राज्यमार्ग मागच्या वर्षी केला. पण त्याच मार्गवरील मणेरी येथील 2 किमी अंतराचा रस्ता दुरुस्त करण्याचा सोडण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी मणेरी येथील ग्रामस्थ व उपसरपंच यांनी रस्त्यावर त्या खड्ड्यात राहून सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  येत्या रविवार म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत मणेरीतील खड्डे बुजवा अन्यथा सोमवारी म्हणजे आज 26 ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, याला सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.

 याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. यामुळे सर्व वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे. तर मणेरी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे आभार मानलेत.