
वेंगुर्ला : श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या सर्वांत मंगलमय महिना आहे. श्रावणात भगवान शंकराची आराधना केली जाते. गेले १५ ते २० दिवस नागपंचमी सणापासून ते उद्याच्या गणेशोत्सवा पर्यंत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून या श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम होत आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाच्या कौशल्यांना चालना देण्याचे काम या उपक्रमातून केले जात असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.
येथील रामेश्वर मंदिरात दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भजनीसम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, संगीत अलंकार अनघा गोगटे, रामेश्वर मंदिराचे मानकरी सुनील परब, संजय परब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित वादक गजानन मेस्त्री, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मिताली मातोंडकर, संगीत विशारद सचिन पालव, भालचंद्र पालव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष राजन पोकळे, सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर आभार शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश येरम यांनी मानले.
दृष्टीहिन सचिन पालव यांना वेंगुर्ले संगीत भूषण पुरस्कार प्रदान
वेंगुर्ले शहरालगत असलेल्या वडखोल सारख्या छोट्या भागातील जन्मतः दृष्टीहिन असलेल्या सचिन पालव यांचा या कार्यक्रमात वेंगुर्ले संगीत भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सचिन हे संपूर्णपणे दृष्टीहिन असूनही त्यांनी आपल्या दिव्यांगावर मात करत संगीत क्षेत्रातील तीन महत्वाच्या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांनी हार्मोनियमवादन, तबलावादन व गायनामध्येही संगीत विशारद पदवी प्राप्त केली आहे. कमी वयात त्यांनी मिळविलेले हे यश अन्य कित्येक जणांना आदर्श निर्माण करणारे आहे. त्यांच्या या यशाचा सन्मान करताना त्यांना सचिन वालावलकर, भालचंद्र केळुसकर बुवा व अनघा गोगटे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.