वेंगुर्ल्यात 'मविआ'कडून तोंडाला काळ्या फीती बांधून निषेध

Edited by: दिपेश परब
Published on: August 24, 2024 09:56 AM
views 329  views

वेंगुर्ला : राज्यातील वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना, बदलापूर प्रकरणातील राज्य सरकारची असंवेदनशीलता, गृह विभागाचे अपयश व राज्यातील ढासळती कायदा-सुव्यवस्था याविरोधातील जनसामान्यांचा आक्रोश सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती तोंडाला लावून निषेध करण्यात आला.  

 यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख रफिक बेग, माजी उपनराध्यक्ष अस्मिता राऊळ, शैलेश परुळेकर, मकरंद गोंधळेकर, उपशाखाप्रमुख महादेव काजरेकर,  स्वाती सावंत, जास्मिन फणसोपकर, अरुणा माडये, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर यासह सेनेचे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

   यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, बदलापूर येथे जी घटना घडली, ती डोकं सुन्न करणारी घटना आहे. हे घाणेरडे कृत्य करणाऱ्या त्या नाराधमाला कोण तरी पाठीशी घालत आहे . त्यामुळे महाराष्ट्रात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आहे. आज या देशात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना प्रतिष्ठा भाजपच्या माध्यमातून मिळवून दिली जाते. जेव्हा ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होती त्यावेळी भाजपचे पदाधिकारी बलात्काऱ्याच्या बाजूने रस्त्यावर उतरतात हे निंदनीय आहे. गुजरात मध्ये ज्या अकरा लोकांना बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा होते त्यांची शिक्षा १५ ऑगस्टला माफ करून त्यांचा पेढे भरवून व हार घालून भाजपच्या वतीने सत्कार केला जातो. म्हणून आम्ही याठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार सहित भाजप पक्षाचाही निषेध करतो. त्यांचे डोळे उघडावेत म्हणू आज आम्ही हे आंदोलन केलं असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर या माध्यमातून उच्च नाययलायला विनंती आहे की, ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्र बंद चा निर्णय स्थगित करण्याचे आदेश तात्काळ दिले त्याच पद्धतीने बलात्कार करणाऱ्या त्या नराधमांना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केली.