
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील शिक्षक भरती मध्ये स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रचलित शिक्षक भरती मधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण )यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट गठीत केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या अनेक वर्षाच्या मागणीला यश मिळाले आहे.
सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे ,परंतु शिक्षक पदभरती नंतर शिक्षकांना वर्षानुवर्षी स्वताचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा जेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील, परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल. तसेच आंतरजिल्हा बदलीमुळे येथील शाळांवर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची तीव्रता कमी होईल. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार व आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीची दखल घेत शासनाने २० ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाने प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभागस्तरावर शिक्षक भरती प्रकिया राबविण्याबाबत अभ्यास गट गठित करण्याचा निर्णय घेतला आहे . जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट गठीत केला आहे. त्यामुळे आता यापुढील शासकीय भरती प्रक्रिया जिल्हा व विभाग स्तरावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांच्या गेल्या काही वर्षाच्या लढ्याला यश आले आहे.