
सावंतवाडी : स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जि. प. शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी अशी मागणी बी. एड स्थानिक बेरोजगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था व जि.प. शाळांमध्ये रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. पवित्र प्रणालीद्वारे या रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक पात्रताधारक व कुशल उमेदवारांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. त्यामुळे बी. एड बेरोजगार संघटनेच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २३ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्षा रेश्मा शिरसाट यांनी दिला आहे.
त्या म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात जिल्हास्तरीय स्थानिक भरती व्हावी आणि त्यात स्थानिकांना 70% व अन्य जिल्हावासीयांना 30% असे 70-30 चे आरक्षण मिळावं, पवित्र पोर्टल मार्फत होणारी राज्यस्तरीय भरती थांबवावी. जिल्ह्याची गुणवत्ता यादी लावली जावी. तसेच सध्या विविध संस्थावर कार्यरत असलेल्या स्थानिक उमेदवारांचा भविष्याच्या दृष्टीने विचार करावा, स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रिक्त पदांवर सामावून घेतले जावे.स्थानिक बोलीभाषा अन्य जिल्हयातील उमेदवार समायोजन करू शकत नाहीत. स्थानिक उमेदवारांना येथील विद्यार्थ्याप्रती अधिक आत्मियता असल्याने ते अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात. अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते. पटसंख्येचे निकष शिथिल करून विषयाप्रमाणे तज्ञ शिक्षक नेमले जावेत, आतापर्यंत झालेली भरती प्रक्रिया पाहता स्थानिक उमेदवारांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे निवड यादीवर प्रतिबंध लावले जावेत. इयत्ता ६वी ते ८वी या रिक्त पदांवर पदवीधर शिक्षक म्हणून स्थानिक बीएड बेरोजगार
उमेदवारांचा प्राधान्याने विचार करावा. ९वी ते १२वी या अनुबंधासाठी होऊ घातलेल्या टीईटी, सीटीईटी परीक्षा रद्द करणेत यावी. तर प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकांना 35000/-रु. मानधनावर तसेच सहाय्यक शिक्षकांना प्रति महिना 30000/-रु. मानधनावर स्थानिक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात सेवेत रुजू करून घेण्यात यावे. गेली कित्येक वर्षे भरती प्रक्रिया झाली नसल्याने अनेक उमेदवार वयाच्या अटींमध्ये बाद होणार आहेत त्यासाठी वयाची अट शिथिल करावी. तर सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी जिल्हा घोषित करून त्यानुसार पट संख्याचा निकष आहे त्यातील अटी शिथिल करण्यात याव्या. उच्चशिक्षित पदव्युत्तर पदविधारक उमेदवारांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना केंद्रप्रमुख पदावर सामावून घेतले जावे त्यासाठी त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येऊ शकते. शिक्षण क्षेत्रातील विविध रिक्त पदांवर स्थानिकांना सामावून घेण्यात यावे अशी मागणी संघटनेकडून केली आहे.
तसेच श्रीराम कानसे म्हणाले, जिल्ह्यात अभियोग्यदाधारक ३२५ शिक्षक जिल्ह्यात आहेत. आमच्या शिकवण्यावर विद्यार्थी व शिक्षक समाधानी असताना बाहेरचे शिक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशासाठी? इथल्या स्थानिक शिक्षकांचा विचार केला जावा. स्थानिक शिक्षकांचा प्राधान्याने विचार केला जावा अशी मागणी केली. यावेळी बीएड स्थानिक बेरोजगार संघटना अध्यक्ष रेश्मा शिरसाट, श्रीराम कानसे, रसिक दळवी, सोनाली परब, दिपीका कांबळे, सिंथिया त्रिंदात, नरेंद्र चव्हाण, गौरी हेवाळेकर, वैष्णवी चव्हाण आदी उपस्थित होते.