
वैभववाडी : कोकणची भूमी ही नररत्नांची खाण आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता आहे. शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. शालेय जीवनापासून ध्येय निश्चित केले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देत परिश्रम घेतल्यास यश निश्चित आहे. असे प्रतिपादन व वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी केले.
आचिर्णे येथे ग्राम बहुउद्देशीय संस्था मुंबई संचलित, आचिर्णे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत व नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमानंद राणे, सचिव शिवाजी कडू, सुरेंद्र उर्फ भाई रावराणे, स्थानिक कमिटी सदस्य उत्तम सुतार, मोहन रावराणे, प्राचार्य श्री. प्रसाद फोंडके, पोलीस हवालदार श्री. धडे, पोलीस कॉन्स्टेबल सौ. चव्हाण व ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.
कुमारी श्रेया संदीप शेळके या विद्यार्थिनी दहावी परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ती सध्या येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार सिद्धेश्वर शंकर वाघमोडे यांनी कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या दोन विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभानंद राणे, शिवाजी कडू यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रिया गोसावी यांनी तर आभार उत्तम सुतार यांनी मानले.