वेळागरवासीयांचा जमिनीचा प्रश्न पेटणार?

स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलनाचा एल्गार
Edited by: दिपेश परब
Published on: August 10, 2024 11:41 AM
views 129  views

वेंगुर्ला : शिरोडा वेळागर क्षेत्रातील ९ हेक्टर गावठण क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळावे या मागणीसाठी व स्थानिक भूमीपुत्रांची घरे-मांगर, विहिरीसह शेती-बागायती बळजबरीने घेण्याच्या प्रयत्नास तीव्र विरोध करण्यासाठी प्राणांतिक लढा देण्याचा निर्धार शिरोडा वेळागर येथील स्थानिक भूमीपुत्रांच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यानुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी वेळागर येथील खाडीतील पाण्यात मुलांसह महिलांचे जलसमाधी आंदोलन तर मुंबई आझाद मैदान येथे स्थानिक भूमिपुत्रांच आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.

    शिरोडा वेळागर येथे ताज प्रकल्पाकडून गावठण जमीन विधानसभेने नियुक्त केलेल्या ना. सी. फरांदे व मोरेश्वर टेंबुर्डे, समितीच्या शिफारशीनुसार वगळण्याची असताना देखील ती अद्यापपर्यंत न वगळल्याने वेळागर भूमीपुत्रांसह त्यांच्या कुटुंबियांना देशोधडीला लावण्याच्या प्रकार ताज प्रकल्प व काही जणांकडून होत आहे असा आरोप करत वेळागर भूमीपुत्रांवर गेल्या ३० वर्षात होत असलेल्या अन्यायासंदर्भात शासनाकडून न्याय मिळण्यासंदर्भात सर्व वैळागरवासीयांची बैठक वेळागर संघर्ष लढ्याचे नेते जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गांडी, मनोहर नाईक, शेखर नाईक, आजू आमरे, मुंबई समितीचे अध्यक्ष संजय आरोसकर, तात्या रेडकर, विनोद आरोसकर, भानुदास गवंडी, विजय आरोलकर, काका आरोसकर, उत्तम आरोसकर, प्रमोद नाईक, संजीव गवंडी, दाजी आरोसकर, वामन गवंडी, भाग्यश्री गवंडी, शैला गवंडी, रसिका आरोसकर, यनिता आरोसकर, शारदा आरोसकर, उर्मिला आंदुर्लेकर, दीपा आमरे, महिमा नाईक, प्रेमां आरोसकर, पुनम काकळे यासह संपूर्ण वेळागरवासीय उपस्थित होते. 

   ताज प्रकल्पासाठी सुरूवातीस ६० एकर जमीन आवश्यक असताना एमटीडीसीमार्फत २०० रुपये प्रतिगुंठा भावाने १४२ एकर जमीन बळजबरीने घेण्यात आली. भूमीपुत्रांनी पैसे न घेता आमचे वेळागर-गावठाण वस्तीचे क्षेत्र वगळण्यासाठी तीव्र आंदोलन उभारले असून याप्रश्नी आता आर-पारच्या लढाईच्या आंदोलनाचे हत्यार भूमीपुत्रांनी अंगीकारलेले आहे. या लढाईतून गेली ३० वर्षे चालढकल करीत अन्याय करू पहाणाऱ्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी वैळागरवासीयांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे. केवळ वेळागर येथेच नव्हे तर मुंबई आझाद मैदान येथेही राज्य सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा हा लढा राज्यातील जनतेस दिसेल असे मत जयप्रकाश चमणकर यांनी व्यक्त केले. यावेळी यावेळी बेकायदेशीरपणे एमटीडीसीने घेतलेली आमची घरे, शेती-बागायती आमच्याच ताब्यात रहाण्यासाठी प्रसंगी बलिदान करू पण एक इंचही मागे न हटण्याचा निर्णय वेळागरच्या सर्व भूमीपुत्रांनी जाहीर केला. 

      यावेळी राजू आंदुर्लेकर, संजय आरोसकर, तात्या रेडकर, मनोहर नाईक, शेखर नाईक, आजू आमरे, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली. वेळागर संघर्ष समितीचे सल्लागार जयप्रकाश चमणकर यांनीही आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन केले.