दापोलीतील आंजर्ले खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा

महसूल विभागाचा कानाडोळा ?
Edited by: मनोज पवार
Published on: January 14, 2025 16:32 PM
views 1091  views

दापोली : राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याच दापोली विधानसभा मतदारसंघातील आंजर्ले खाडीत बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असूनही मह्सूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर काल सायंकाळी आंजर्ले खाडीजवळ असलेल्या अडखळ कदमवाडी  येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणारे डंपर अडवले. मात्र तहसीलदार दापोली यांना यासंदर्भात पत्रकारांनी माहिती देवूनही महसूल विभागाचे अधिकारी मध्यरात्री पर्यंत न पोचल्याने कंटाळून ग्रामस्थही घरी गेल्याने हे डंपर तेथून निघून गेले. यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत सक्शनद्वारे वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असून दररोज मोठ्या संख्येने तेथून डंपर मधून तालुक्यात वाळूची वाहतूक केली जाते. दोन वर्षापूर्वीच अडखळ गावात जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र वाळू वाहतूक करणाऱ्या या डंपरमुळे या रस्त्याची दूरवस्था झाली असून सर्व रस्ता मातीचा झाला आहे. डंपरच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरील सर्व माती घरामध्ये तसेच मंदिरामध्ये उडत असल्याने तसेच दिवस रात्र हि वाहतूक सुरूच असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले होते. अखेर या नागरिकांनी वाळूची वाहतूक करणारे डम्पर काल सायंकाळी अडविले, याची माहिती त्यांनी पत्रकारांनी दिली.  पत्रकार तेथे पोचल्यावर त्यांनी दापोलीच्या तहसिलदार अर्चना बोंबे यांना माहिती दिल्यावर त्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना तेथे पाठविते असे सांगितले मात्र मध्यरात्री पर्यंत तेथे महसूल विभागाचे अधिकारी पोचलेच नाहीत. हा प्रकार घडत असताना तेथे वाळू व्यावसाईक पोचले व त्यांनी त्या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ महसूल विभागाचे अधिकारीही न आल्याने व मध्यरात्र झाल्याने  ग्रामस्थही कंटाळून तेथून निघून गेल्याने डम्परचालकांनी सुटकेचा निश्वास सोडत तेथून पोबारा केला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सक्शन पंपाद्वारे वाळूचा उपसा करण्यास बंदी असतानाही आंजर्ले खाडीत बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करण्यात येत असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असूनही महसूल विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिवस रात्र दापोली तहसीलदार कार्यालयासमोरून वाळूची बिनदिक्कतपणे वाहतूक केली जात असताना  नागरीकांना वाळू वाहतूक करणारे हे डंपर दिसत असले तरी ते महसूल यंत्रणेला दिसत नसल्याने महसुलचे पथक करते तरी काय असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. महसूल राज्यमंत्री व दापोलीचे आमदार योगेश कदम याकडे लक्ष देणार का की तेही या वाळू व्यावसाइकाना पाठीशी घालणार असा प्रश्न दापोली तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.