
सावंतवाडी : कॅथॉलीक अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस 'कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार हा मानाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देत कॅथॉलीक अर्बनला गौरविण्यात आले.
अलिबाग येथे विभागीय सह निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा 2025 आयोजित करण्यात आलंआ होता. यात 200 ते 500 कोटी एकत्रित व्यवसाय गटात कॅथॉलीक अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते उत्कृष्ठ पतसंस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पतसंस्थेच्या चेअरमन आनमारी डिसोझा, संचालक अगस्तिन फर्नांडिस, जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस, फ्रॅकी डान्टस, फातिमा कार्डोझ आदींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भारतीय संविधान देऊन हा गौरव करण्यात आला.
सातत्यपूर्ण प्रगती, सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिध्दतेमुळे 'कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार' हा मानाचा सन्मान कॅथॉलीक अर्बन पतसंस्थेला देण्यात आला. कोकण विभागातून अनेक अर्ज आल्यामुळे ही निवड प्रक्रिया चुरशीची होती. परंतु यात कॅथॉलीक अर्बनने यश मिळवले आहे. याप्रसंगी राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, खासदार धैर्यशील पाटील, मिलिंदसेन भालेराव, निरंजन डावखरे, शैलेशजी कोतमिरे, प्रमोद जगताप, नंदकुमार चाळके, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.