चिपळूण : अखिल कोकण युवा संघ पुणे यांच्या वतीने यावर्षी चिपळूण येथील माजी सभापती सौ पूजा शेखर निकम यांना कोकण भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पुणे धायरी येथे दि.९ फेब्रुवारी होणाऱ्या संस्थेच्या नववा वर्धापन दिनी कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अखिल कोकण युवा संघ पुणे या संस्थेने अल्पावधीतच आपल्या कामाच्या जोरावरती सर्व कोकणवासीयांच्या मनामध्ये आपलं नाव कोरल आहे. यावर्षी पुणे धायरी येथे संस्थेचा ९ वा वर्धापन दिन ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील चिपळूण सावर्डे येथील आ. शेखर निकम यांच्या पत्नी आणि चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा शेखर निकम यांना संस्थेच्या वतीने यावर्षी "कोकण भूषण" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सौ पूजा निकम यांनी तळागाळातील महिलांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शेतीविषयक मार्गदर्शन करत व बचत गटांना प्राधान्य देत त्यांनी उत्कृष्ट काम ग्रामीण भागामध्ये केलेले आहे. पंचायत समितीच्या सभापती पदावर असताना त्यांनी तालुक्यातून येणाऱ्या प्रत्येक माणसाची कामे वेळेत करणे आणि तो वेळेवर घरी परत गेला पाहिजे या दृष्टीने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले होते. आपल्या कारकीर्द त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक असे काम केले.
या सर्व कामाची दखल घेत अखिल कोकण युवा संघ पुणे यांनी कोकण भूषण या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांना पुणे धायरी येथे संस्थेच्या ९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश जाधव, सचिव सचिन उतेकर आणि खजिनदार सुरेश शिगवण यांनी दिली.