
दोडामार्ग : मांगेली धबधब्यावर वर्षापर्यटणासाठी आलेल्या बेळगाव कर्नाटक येथील युवकांनी गांजाच्या नशेत दोडामार्गमधील स्थानिक युवकांवर हल्ला चढविल्याची घटना उघडकिस आली आहे. यावेळी त्यांच्याकडून दगडफेकही करण्यात आली. यात कसई- दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर गोवा येथे उपचार सुरू आहेत.
यावेळी मांगेलीमधील स्थानिक मदतीसाठी धावून येताच हल्लेखोरांनी आपल्या दुचाक्या तेथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. चव्हाण सध्या म्हापसा गोवा येथील व्हिजन रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.तर हल्लेखोरांच्या एकूण सहा दुचाकी दोडामार्ग पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आल्या आहेत.
ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली. मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी बेळगाव येथील युवकांचा एक ग्रुप संध्याकाळच्या सुमारास आला होता. हे पर्यटक युवक नशेत होते. त्यांच्याकडून बेशिस्त वर्तन व हुल्लडबाजी सुरू होती. याच दरम्यान दोडामार्गमधील शुभम मुळगावकर व अन्य दोघे युवकही मांगेलीत गेले होते. यावेळी त्या हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यातील एकाने मुळगावकर यांच्यावर दुचाकी आणून मारली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. याबाबत मुळगावकर यांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना भ्रमणध्वनी वर कल्पना देताच ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले. मात्र नशेत बेभान झालेल्या त्या युवकांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला आणि दगडफेक केली. त्यात चव्हाण जखमी झाले.
दरम्यान याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन सुभाष चव्हाण, यांनी फिर्याद दीलेनुसर 10 ते 12 अनोळखी इसम यांचेवर हा गुन्हा दखल असून त्यांचेपैकी काहींनी सोन्याची चैन लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मित्र समीर रेडकर, शुभम मुळगावकर, सागर नाईक यांना कर्नाटक पासिंगच्या दुचाकी असलेल्या अनोळखी 10 ते 12 इसमांनी शिवीगाळी करून लाथाबुक्यानी मारहाण केली. समीर रेडकर याचे गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेऊन गेले म्हणून यातील फिर्यादी व त्यांचे मित्र लक्ष्मण कवठणकर तसेच पराशर सावंत असे नमूद कर्नाटक पासिंग दुचाकी असलेल्या अनोळखी 10 ते 12 इसमांना विचारणा करण्याकरिता मांगेली फणसवाडी येथे गेले असता त्या 10 ते 12 अनोळखी इसमांनी लक्ष्मण कवठणकर याला तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्यानी मारहाण करून मुका मार दिला. तसेच त्यांचेपैकी बॉडीबिल्डर असलेल्या इसमाने हातात दगड घेऊन फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर दोन वेळा मारून डोकीवर व नाकावर दुखापत केली असल्याचे नमूद करणेत आले. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आरोपींच्या दुचाकी ताब्यात घेतल्या असून आरोपींचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री भगत करत आहेत. लवकरच संशयित आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती मंगळवारी सायंकाळीं श्री. ओतारी यांनी दिली आहे.