
कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघांतील उमेदवारी वरून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात जोरदार शक्तिप्रदर्शन होत असताना आता आमदार नितेश राणे यांनी त्यात ट्विस्ट टाकला आहे. किरण सामंत यांची कोणी चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत. एवढेच नाही तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस कधीही खाली हात माघारी परतत नाही आणि "किरण सामंत हे तर राजकरणात लंबी रेस का घोडा आहेत" असं मोठ विधान करत नितेश राणे यांनी या मतदार संघातील उमेदवारीला एक नवा ट्विस्ट दिला आहे.
याबाबत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे सर्वच नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी महायुतीचा उमेदवार निवडून यावा, मोदींचे हात बळकट व्हावे आणि इथला खासदार हा मोदींच्या विचारांचा निवडून यावा, या दृष्टिकोनातून प्रचार करत आहोंत. नुकतीच किरण सामंत यांची भेट भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही. शिवाय किरण सामंत हे राजकारणातील "लंबी रेस का घोडा आहेत." त्यामुळे किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत. असे उत्तर आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना दिले आहे.