तळकटमध्ये आढळला तब्बल १२ फुट किंग कोब्रा

Edited by: लवू परब
Published on: June 06, 2025 20:10 PM
views 160  views

दोडामार्ग : तळकट गावात एका घराजवळ तब्बल १२ फुट लांब किंग कोब्रा आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधल्यावर रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन सर्पाचा यशस्वी रेस्क्यू केला व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

हा साप गावातील एका घराजवळ दिसून आला होता. परिसरात खेळणारी मुले आणि आजूबाजूचे ग्रामस्थ त्याला पाहून घाबरून गेले. सर्प अत्यंत भव्य आणि धोकादायक असून, त्याचे हालचाल लक्षात घेऊन स्थानिकांनी वनविभाग व सर्पमित्र विठ्ठल गवस यांना माहिती दिली. 

वनविभागाचे कर्मचारी, विठ्ठल गवस व त्यांचे साथीदार दाखल झाले. अत्यंत जहरील्या सर्पाला शिताफीने रेस्क्यू केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या घटनेमुळे तळकट गावात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र सर्पमित्र विठ्ठल गवस व वनविभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विशेष म्हणजे अवघ्या महिन्याभरापूर्वीच तब्बल पंधरा फूट लांब किंग कोब्राचे झोळंबे गावात रेस्क्यू करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात किंग कोब्राचे मोठे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.