
देवगड : देवगड तालुक्यातील खुडी येथील सरपंच दीपक नारायण कदम यांना मारहाण झाल्या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास खुडी जुवीवाडी येथे घडली असून महिलेच्या अंत्यविधीपूर्वी तिच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी म्हणणे मागितल्याचा राग मनात ठेवून खुडी सरपंच दीपक नारायण कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथील रोहन संजय जोईल (वय २१, रा. खुडी जुवीवाडी) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देवगड खुडी जुवीवाडी येथील संशयित रोहन जोईल याची आई मयत झाल्याने त्याला भेटण्यासाठी खुडी सरपंच दीपक कदम हे त्याच्या घरी गेले होते. त्यांनी सरपंच या नात्याने संशयित रोहन जोईल याला ‘तुझ्या आईच्या मृत्यूबाबत तुमची काही तक्रार असल्यास अंत्यविधी होऊ शकत नाही. जर तक्रार नसेल तर मला ग्रामस्थांना तसे सांगावे लागेल. त्यानंतर तुझ्या आईच्या प्रेतावर अंत्यविधी करण्यात येतील. भविष्यात तिच्या मृत्यूबाबत तक्रार नाही, असे मला माझ्याकडे लिहून दे,’ असे सांगितले. मात्र याचा राग आल्याने संशयित रोहन जोईल याने ‘मी तसे काय लिहून देणार नाही’, असे सांगून सरपंच दीपक कदम यांना हाताच्या थापटाने व ठोश्याने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत संशयित रोहन जोईल याच्या उजव्या हातातील स्टील धातूसारखे गोल कडे सरपंच कदम यांच्या डोक्याला लागून त्यांना दुखापत झाली. या घटनेची फिर्याद सरपंच कदम यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून फिर्यादीनुसार संशयित रोहन जोईल या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.