LIVE UPDATES

कोकणात उद्योजकांकडून सरकारची गंभीर फसवणुक

शेतीचा युरिया वापरला कारखान्यात | लोटे एमआयडीसीतील कंपनीवर गुन्हा दाखल
Edited by: मनोज पवार
Published on: June 30, 2025 13:04 PM
views 258  views

खेड : तालुक्यातील लोटे-पर्शुरम एमआयडीसीत केंद्र शासनाच्या अनुदानित युरियाचा गैरवापर करून सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि पुरवठादार कंपन्यांसह एकूण ९ जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना १५ मे २०२५ रोजी सायंकाळी घडली असून, २७ जून २०२५ रोजी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाला आहे भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८(४), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३(२)(d), ७, ८, ९, १० अंतर्गत.

या प्रकरणी सचिन बुवाजी फुले, कृषी सहसंचालक कार्यालय, ठाणे येथील विभागीय निरीक्षक यांनी तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या यादीत रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय मुलचंदानी, राजेश मुलचंदानी, करण मुलचंदानी व कुणाल जवानी, प्रॉडक्शन मॅनेजर तारा सिंग रावत, फॅक्टरी मॅनेजर दिनेश कदम आणि स्टोअर इंचार्ज राकेश जड्याल यांचा समावेश आहे. तसेच पुरवठादार म्हणून के.व्ही.जे केमिकल्स (अहमदाबाद) आणि वाय.एम. अँग्रो केमिकल्स अँड सॅनिटायझर (गांधीनगर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांनी संगनमताने ‘निम कोटेड युरिया’ या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताचा औद्योगिक वापर करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केली. कृषी विभागाने सखोल चौकशी करून पुरावे सादर केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, यामध्ये आणखी काही आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या प्रकाराने खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येईल का, हे पाहावे लागेल.