
खेड : शिव परमात्मा या धरेवर अवतरीत होऊन ८९ वर्षे पूर्ण झाली असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने आत्म्याचे सत्य ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांनी ईश्वरी विश्व विद्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन खेड सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी गीता बहेन यांनी येथे केले. बुधवार दि.२६ रोजी खेड येथील प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवासाठी सैन्य दलातील निवृत्त कर्नल प्रकाश चव्हाण, रोटरी स्कूलचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, महिला कीर्तनकार ह.भ.प. वीणाताई महाडिक, उद्योजक अमोल बुटाला, वैद्य दिव्या बेकर, पत्रकार अनुज जोशी आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या प्रांगणात महिला कीर्तनकार वीणाताई महाडिक यांच्याहस्ते शिव ध्वज आरोहण करण्यात आले. त्यानंतर सहस्त्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखाव्याचे उद्घाटन कर्नल प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांनी शिवलिंगाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
यावेळी ब्रह्म कुमारी गीता बहेन यांनी अध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, आम्हा सर्व मानवा आत्म्यांचे पिता शिवबाबाच आहेत. कमलेश्वर या सत्यम शिवम सुंदर शिवबाबांना सुंदर अशा सहस्त्र कमळामध्ये पाहूया. या सुंदर दर्शनाने धन्य होऊया. त्रिमूर्ती शिवजयंती असल्यामुळे ८९ दीप प्रज्वलन भाग्यशाली मान्यवरांच्या कमल हस्ते करण्यात आले. प्रत्येकाने आपल्यातील आत्म ज्योती जागवणे व कलियुगाचे सत्ययुगात रूपांतर करण्यासाठी hr ईश्वरीय कार्य सुरू आहे.
यावेळी उपस्थितांनी विविध व्हॅल्यू गेम खेळले. यावेळी अनेकांनी मनातील दडपण परमेश्वराला पत्र लिहून सांगितले व त्वरित परमेश्वराकडून उत्तर प्राप्त केले. यावेळी ईश्वरीयप्रसाद व ईश्वरीय भेट देण्यात आली. महाशिवरात्री निमित्त उभारण्यात आलेल्या सहस्त्र कमलेश्वर मंदिराचं दर्शन आठवडाभर राहणार आहे, असे जाहीर करण्यात आले. तसेच दि. २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत तीन दिवसीय मोफत राज योगाचे शिबिर सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. या शिबिराचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन खेड सेवा केंद्राच्या संचालिका गीता बहेन यांनी केले आहे.