खेड एसटी डेपोला चिपळूण अर्बन बँकेकडून रूट बोर्ड

Edited by: मनोज पवार
Published on: July 15, 2025 15:53 PM
views 656  views

खेड  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड एस.टी. डेपोला चिपळूण अर्बन बँकेच्या सौजन्याने विविध मार्गांवर धावणाऱ्या एस.टी. बससाठी रूट बोर्ड तयार करून देण्यात आले. हे सर्व रूट बोर्ड खेड तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या बसेसवर लावले जाणार आहेत.

या उपक्रमांतर्गत खेड डेपो व्यवस्थापक राजेशिर्के साहेब यांच्याकडे बोर्डचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. यावेळी रोटरी स्कूलचे अध्यक्ष बिपिनशेठ पाटणे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे व शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंदशेठ तोडकरी, चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष रहीमान दलवाई, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष  सतीश अप्पा खेडेकर, संचालक ॲड. दिलीप दळी, रत्नदीप देवळेकर, शाखाधिकारी स्वप्नील जाधव, तसेच एस.टी. डेपो खेड येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेड डेपोच्या गरजा ओळखून सामाजिक भानातून या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल डेपो व्यवस्थापक श्री. राजेशिर्के यांनी चिपळूण अर्बन बँकेचे आभार मानले. या उपक्रमामुळे प्रवाशांना मार्गदर्शनाची सुविधा मिळून एस.टी. सेवा अधिक सुकर होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.