
सावंतवाडी : येथील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत पगाराचे आणि पीएफचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी सकाळपासून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. दुपारी शिक्षणमंत्र्यांनी यशस्वी शिष्टाई करून यावर तोडगा काढला. उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळा यांनी या आंदोलनकांचा प्रश्न तातडीने सोडवा असे आवाहन मंत्री केसरकर यांना केले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सकाळी भर उन्हात हे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संघटक मायकेल डिसोझा, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर यांनी सहभागी होत पाठींबा दिला.एका खासगी कंपनीच्या तब्बल २१० कामगारांचे पगाराचे पैसे संबंधित कंपनीने दिलेले नाहीत. याविरोधात या युवक - युवतींनी दाद मागण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उंबरे झिजवले. तर काही दिवसांपूर्वी मंत्री केसरकर यांनाही निवेदन देत लक्ष वेधले होते. मात्र अद्यापही त्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याने आजपासून थेट मंत्री केसरकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनास भेट देत यांवर तोडगा काढला.