तेलींच्या बॅनरवर केसरकरांचा फोटो | आंबोली रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 13:35 PM
views 133  views

सावंतवाडी : राज्यात भाजप व शिवसेनेची युती असली तरी सावंतवाडी मतदारसंघात दोन्ही पक्षात कुरघोडीच राजकारण पहायला मिळत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणाऱ्या ऑनलाईन भुमिपूजनांपूर्वीच भाजपनं प्रत्यक्षस्थळी जात नारळ फोडले होते. शिवसेनेचे शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर व भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यातील संघर्ष यातून दिसत होता. मात्र, आंबोलीतील एका कार्यक्रमात वेगळंच चित्र पहायला मिळालं. राजन तेलींचा फोटो असणाऱ्या बॅनरवर चक्क शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा फोटो नेत्यांच्या यादीत दिसून आला.  

सावंतवाडीमधील आंबोली गावातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आंबोली मुख्य रस्ता ते धनगर वाडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजप विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली व येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर,सरपंच सावित्री पालेकर,माजी सभापती आत्माराम पालेकर,शक्ती केंद्र प्रमुख बाळा सावंत, ग्रा.प.सदस्य दिपक नाटलेकर, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष नमिता राऊत, वामन पालेकर आदी धनगरवाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी लावण्यात आलेल्या बॅनर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या फोटोच्या यादीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा फोटो देखील दिसून आला. या बॅनरवर माजी आमदार राजन तेली व सरपंच सावित्री पालेकर यांचे फोटो असून १० लाख मंजूर केल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.  एकीकडे, शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपकडून केसान गळा कापला जात असल्याचं वक्तव्य करताना शिवसेनेच्या आमदारांना डावलून भाजपकडून विकासकामांची भुमिपूजन केली जातात असा आरोप केला होता. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील आपल्या मतदारसंघात अशी भुमिपूजन होतात. या विकासासाठी स्थानिक आमदारांची सही लागते याची कल्पना संबंधितांना नसेल त्यामुळे ते स्टंटबाजी करत आहेत. स्थानिक आमदारांच्या सहीनंतरच पालकमंत्री काम मंजूर करतात. त्यामुळे शुभारंभ करणारे केवळ बॅनरच लावू शकतात असा टोला दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत हाणला होता. यातच भाजपच्या माध्यमातून लावलेल्या बॅंनरवर राजन तेलींसह शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा फोटो लागल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला विषय प्राप्त झाला आहे ‌