
सावंतवाडी : माझ्या आजारपणामुळे डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे माझ्या मनात इच्छा असुनही मी आपली प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन विरोधक मतदारांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी या अफवांना बळी न पडता मी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उभे केलेले २० नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या धनुष्यवाण निशाणी समोरील बटण दाबुन आपले बहुमुल्य मतदानरुपी शुभशीर्वाद त्यांना देऊन विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने त्यांनी हे विनंती पत्र लिहीले आहे.
यात ते म्हणाले, माझ्या राजकीय कारकीर्दीत जशी तुम्ही मला आजपर्यंत साथ दिलीत तशीच साथ यापुढेही द्याल याचा मला विश्वास आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात सावंतवाडी शहरातून झाली आहे, आपण मला चार वेळा आमदार बनवले. आपणाशी माझे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते आहे. आज सावंतवाडी शहरात वेगवेगळी आमिषे दाखवून तुमच्या शहराच्या एका सुपुत्राला राजकीयदृष्टया संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मला आपल्या पाठिंब्याची नितांत आवश्यकता आहे. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास यापूर्वीही झाला आहे व पुढेही विकासाची घोडदौड अशीच चालत राहील याची मी आपणांस ग्वाही देतो.
आमचे शिवसेनेचे सर्व उमेदवार सुशिक्षीत व कार्यक्षम आहेत म्हणून त्यांच्या धनुष्यवाणा समोरील बटन दाबुन आपण आपले शुभशीर्वाद मला व माझ्या सहका-यांना द्यावे हि पुन्हा एकदा कळकळीची नम्र विनंती असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केल आहे.











