केसरकरांचा 'सावंतवाडीत गोंधळ, मुंबईत मुजरा' : मायकल डिसोझा

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2024 06:23 AM
views 252  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाच राजकारण गलिच्छ झालं आहे. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती स्थानिक आमदार दीपक केसरकर यांची झाली आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासारखी टोपी घालण्याच काम ते करत आहेत. एकामेकांच्या विरोधातच हे बोलून सावंतवाडीत गोंधळ घालून, मुंबईत मुजरे घालत आहेत असा जोरदार हल्लाबोल उबाठा शिवसेनेचे तालुका संघटक मायकल डिसोझा यांनी केला आहे. 

मित्रपक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. यामागे त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांचा हात आहे‌. अन्यथा एवढी धुसफूस दिसली नसती. आमच्यासाठी ही संधी असून निश्चितच भगवा इथे फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या शिवसेना संपर्क अभियानाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. मात्र, गाव ओस पडत आहेत. युवावर्ग गावात राहिला नाही. रोजगार देण्यासाठी अपयशी ठरल्यान हे होत आहे. मुलांना जर्मनीत नंतर पाठवा आधी मतदारसंघात रोजगार द्या, अन्यथा आपणालाच जर्मनीस पाठवावं लागेल असा टोला श्री. डिसोझा यांनी हाणला.

शरद पवर, उद्धव ठाकरेंनी भरभरून देऊनही अन्याय केल्याचे केसरकर सांगत आहेत‌.‌आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २४ तास असताना विकासापासून अन्याय कुणी केला हे केसरकरांनी सांगावं. भाजप केसरकरांवर तुटून पडलेल असताना वरिष्ठ दखल घेत नाहीत. त्यांना वरिष्ठ देखील कंटाळले आहेत. कुठलाच पक्ष त्यांना जवळ करण्यास इच्छुक नाही असं मत व्यक्त केले.  तसेच आंबोली, चौकुळ, गेळेच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता. हा कबुलायतदार प्रश्न १९९८ नंतर आला. उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न मार्गी लावला होता. मात्र, केसरकर यांच्या हेकेखोर स्वभावामुळे हा प्रश्न सुटला नाही. येथील मोक्याची जमिन त्यांना धनदांडग्यांच्या घशात घालायची आहे. मात्र, ग्रामस्थ हे ओळखून चुकले आहेत. शेकडो एकर जमिनी आरक्षित करून ठेवण्याच केसरकरांच धोरण उद्धव ठाकरेंना पटलं नाही. त्यामुळे केसरकरांनी यात खो घातला होता. मुख्यमंत्री खास असताना अद्याप का असा प्रश्न सुटत नाही असा सवाल केला. तर जागांवर कुणाचा डोळा आहे हे केसरकरांनी नाव घेऊन जाहीर करावं, अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा असं आव्हान त्यानी दिलं.यावेळी संदीप माळकर, रियाज खान, सुनिल गावडे आदी उपस्थित होते.