
कुडाळ : सावंतवाडी मतदारसंघातून काही झालं तरी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवडणूक लढवतील तर कुडाळ मालवण मतदार संघातून महायुती जो निर्णय घेऊन जो उमेदवार दिला जाईल तोच उमेदवार निवडणूक लढवेल तर खासदारकीसाठी आपण इच्छुक नसल्याचं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे पक्ष निरीक्षक आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेना जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी मेळावा कुडाळ गुलमोहर येथे आयोजित करण्यात आला होता. यानंतर पक्षनिरीक्षक रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्ष संघटना, मतदारसंघ बांधणे, पक्ष संघटना वाढवणे, सदस्य नोंदणी या सर्वांचा आढावा घेतला या आढावा बैठकीला आमदार रवींद्र फाटक, जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वालावलकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे आणि संदेश पटेल आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी व पदाधिकारी मेळावा तालुक्यातील गुलमोहर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर पक्ष निरीक्षक आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, कुडाळ मालवण मतदार संघावर आमचा दावा आहे, त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकरच निवडणूक लढवतील, व कुडाळ मालवण मतदारसंघात महायुती जो उमेदवार देईल तोच उमेदवार निवडणूक लढवेल. तर यावेळी पत्रकारांनी आपण खासदारकीसाठी इच्छुक आहात का असे विचारले असता मी सद्यस्थितीत तरी खासदारकीसाठी इच्छुक नाही मात्र पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले. तर ब्रिगेडियर सुधीर सावंत नाराज असल्याची चर्चा होत असल्याबाबत विचारले असता ब्रिगेडियर सुधीर सावंत हे जिल्ह्यात असून ते नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया रवींद्र फाटक यांनी दिली. तर पक्ष संघटनेबाबत बदल होण्याची शक्यता आहे का असे विचारले असता जे काम करत आहेत ते कायम राहतील मात्र जिथे बदल आवश्यक आहे तेथे बदल केला जाईल असे आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले.