
सावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिल्लीत जाऊन केल्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचे श्रेय मराठी भाषा मंत्री केसरकर यांना आहे असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. शुक्रवारी सावंतवाडीत येथे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता ते बोलत होते.
ते म्हणाले, मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी अहोरात्र काम करून पदाला न्याय दिला. शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवले. शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कधी कधी कठोर भूमिका ही घेतली. याचा मी एक साक्षीदार आहे. कंत्राटी शिक्षक भरती किंवा अन्य प्रश्न सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला यासाठी मराठी भाषेचे मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी केलेला पाठपुरावा मी स्वतः बघितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिल्लीला गेल्यानंतर ते सतत या विषयाच्या मागे लागायचे आणि विशेष म्हणजे अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा निर्णय दोन महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने घेतला. याला अंतिम मंजुरी देत मराठी भाषेला अभिजीत भाषेच्या दर्जा दिला आहे. हे आपल्या सर्व मराठी जणांसाठी कौतुकास्पद आहे. पण या सगळ्या मागचे श्रेयही कोकणातील एका मंत्र्यांचे आहे असे आ.म्हात्रे यांनी सांगितले.यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.