
सावंतवाडी : दिपावलीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठांत शालेय शिक्षणमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत कुबेर लक्ष्मीचे दर्शन घेत व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. गेली चार दशक केसरकर यांच्याकडून ही परंपरा अखंडीत जोपासली जात आहे.
शहरातील व्यापा-यांनी आपल्या दुकान, कार्यालयात तसेच उद्योगक्षेत्रात कुबेर लक्ष्मी पूजन केले. यावेळी प्रसाद म्हणून बताशाचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने मंत्री दीपक केसरकर यांनी व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा देत लक्ष्मीचे दर्शन घेतले. गवळी तिठा, उभाबाजार सुवर्ण पेढी, मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुलासह संपूर्ण बाजारपेठेत त्यांनी कुबेर लक्ष्मीचे दर्शन घेतले. गेली चार दशक दीपक केसरकर ही परंपरा जोपासत आहेत. बाजारपेठेतील दर्शनानंतर मोती तलाव येथे उपस्थित नागरिकांना केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
सावंतवाडीने मला नेहमीच आशीर्वाद दिले आहेत. येथील जनतेने मला प्रेम दिल आहे. त्यामुळे लोकांना भेटाव दीपावली आनंद सोहळ्यात सहभागी व्हाव या हेतूने मी दरवर्षी लक्ष्मी पूजनला व्यापारी पेठेत भेट देतो व लक्ष्मीचे दर्शन घेतो.महाराष्ट्राची मोठी जबाबदारी असल्यामुळे येण कमी होत. मात्र, या दिपावली सणाच्या निमित्ताने सर्वांची भेट होते. सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण असते. त्यांच्या सुखात सहभागी होण्याचा आनंद मिळतो. मी येणार म्हणून रात्री उशिरापर्यंत व्यापारी वर्ग प्रतिक्षेत असतो. सुख आणि शांती नांदते त्यावेळी लक्ष्मीची पावलं घरोघरी येत असतात. महिलांना, व्यापाऱ्यांना बळ मिळावं या भागामध्ये समृद्धी यावी यासाठीच माझी लढाई असते अशी भावना यावेळी दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.