प्रकृती ठीक नसताना केसरकर मेहनत घेतायत !

केसरकरांचे हात बळकट करा: मंत्री उदय सामंत
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 22:34 PM
views 58  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक जितकी शिवसेनेच्या प्रतिष्ठेची आहे, तितकीच आमदार दीपक केसरकर यांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जनतेने सर्व नगरसेवकांच्या उमेदवारासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला धनुष्य बाणा समोरील बटन दाबून नगरपरिषदेच्या सभागृहात पाठवून जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तर कोणीतरी भावनिक आणि ऐतिहासिक आवाहन करत आहे. पण, काम करण्याची ताकद कोणामध्ये आहे असा चेहरा निवडा. प्रकृती ठीक नसताना सुद्धा केवळ शहरासाठी केसरकर मेहनत घेत आहेत. आपलं आयुष्य त्यांनी सावंतवाडीसाठी वेचलं आहे‌. त्यामुळे त्यांचे हात पुन्हा एकदा बळकट करा असेही आवाहन श्री. सामंत यांनी केल. शहरातील विविध क्षेत्रातील बुद्धीजीवी लोकांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात दीपक केसरकर यांच्या समोर झाली. सहनशीलतेचा पराकोटीच व्यक्तीमत्व केसरकर आहेत. शहराचा, गावांचा, मतदारसंघाचा विचार करणार हे नेतृत्व आहे. कामातून ते उत्तर देतात. माझ्या विजयात देखील श्री. केसरकर यांचा वाटा आहे. सिंधुरत्न योजनेचा लाभ मिळाल्यान मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, संजू परब यांना पाडण्यासाठी घराघरात जाऊन प्रयत्न होत आहे. मात्र कुणीही कुठे फिरले तरी संजू परब पराभूत होणार नाही. नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार विजयी होईल, आम्ही जनतेशी बांधील असणारी लोक आहोत. सावंतवाडीतील क्रांतिकारक बदल दीपक केसरकर यांच्यामुळे दिसतो. त्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडणूक देत संधी द्यावी. काम करण्याची कुवत, क्षमता कोणात आहे ? याचाही विचार करावा. सावंतवाडीसाठी ज्यांनी आयुष्य समर्पित केल त्यांना साथ द्या, त्यांनी विश्रांती घेऊन विजयी मेळाव्यात उपस्थित राहण्याचा विश्वास देत सावंतवाडी नगरपरिषद पुन्हा एकदा  केसरकर यांच्या ताब्यात द्या. येणाऱ्या ३ डिसेंबरला गुलाल उधळण्यासाठी त्यांना आमंत्रित करा असे आवाहन त्यांनी केले.

तसेच सिंधुदुर्गची बेरोजगारी दुर करण्यासाठी माझा पुढाकार असणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून महिलांसाठी ८० टक्के निधी मी देण्यास सक्षम आहे. सावंतवाडी शहरातील १ हजार मुलं स्वताच्या पायावर उभी राहतील यासाठी संकल्प करा, सगळं मंत्रालय सावंतवाडीत घेऊन येतो असा विश्वासही मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री आम. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अशोक दळवी, बबन राणे, सचिन वालावलकर, अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, गोविंद वाडकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, बंड्या कोरगावकर, ॲड. सायली दुभाषी, पूजा आरवारी, उत्कर्षा सासोलकर, वैभव म्हापसेकर, वेदिका सावंत, प्रसाद नाईक, बासित पडवेकर, हर्षा जाधव, स्नेहा नाईक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.