केसरकर फसवे मंत्री : प्रविण भोंसले

मुख्यमंत्र्यांनी सावंतवाडीकरांची निराशा केली : अर्चना घारे-परब
Edited by: विनायक गावस
Published on: June 07, 2023 19:49 PM
views 89  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे फसवे मंत्री आहेत. त्यांना सावंतवाडीकर जनता ओळखून आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्काराला नागरीक गोळा करून आणण्याची वेळ त्यांच्यावर आली असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लगावला. तर सावंतवाडीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठोस काही घोषणा न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडत सावंतवाडीकरांची निराशा केली अस मत राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.  


अर्चना घारे-परब म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री सावंतवाडीत आले होते. ते काय बोलतात याकडे सावंतवाडीकरांच लक्ष होतं. त्यांच्या हस्ते अनेक शुभारंभ भुमिपूजन झाली. याचा आनंद आहे. ही काम लवकर पूर्ण होवोत अशी इच्छा आहे. जिल्हा शिक्षणात महाराष्ट्रात प्रथम असून मुलं हुशार असताना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं आहे. याबाबत मुख्यमंत्री ठोस भूमिका घेत प्रश्न मिटवतील. शेतकरी, महिला, तरूणांचे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी सावंतवाडीकरांची निराशा केली. मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न सुटेलेला नाही. आजही गोवा बांबुळीवर अवलंबून आहेत. रेल्वेटर्मिनसचा प्रश्नही प्रलंबित आहे. आदीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती. पण, सावंतवाडीकरांची घोर निराशा झाली. मिरगाचा पाऊस नाही पण घोषणांचा पाऊस पहायला मिळाला असा टोला राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी लगावला. 


तर राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, आमच्यावेळी पण मुख्यमंत्री आले. आम्ही पण सत्कार केलेत ते फार जूने नाहीत. ते सत्कारानं भारावून गेले होते. परंतु, काल नागरी सत्कार करण्यासाठी नागरीक हे गोळा करावे लागले. हे ऐकून धक्का बसला. एक नागरिक म्हणून वाईट वाटलं. औपचारिक पणा फक्त पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम होतात पण काल ते दिसल नाही. स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे सोबत होते. निराशाजनक असा कार्यक्रम काल झाला. भाजपसोबत असताना आपण आणि आपला फोटोच केसरकर मिरवत होते. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा कार्यक्रमात नव्हते. एकला चलो रे, मीच करतो अशा भुमिकेमुळे निराशा झाली. माजी नगरसेवकांना सोबत घेण आवश्यक होत. ते न केल्यानं नागरिक गोळा करायची वेळ केसरकरांवर आली. केसरकर,लोकांना उपरे, बाहेरचे म्हणतात‌. पत्रात सुद्धा त्यांनी म्हंटले. बाहेरचे कोण आहेत ? असा सवाल प्रविण भोसले यांनी केला. शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे फसवे मंत्री आहेत. त्यांना सावंतवाडीकर जनता ओळखून आहे. त्यामुळेच सावंतवाडीकरांनी कालच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं विधान प्रविण भोसलेंनी केलं.

 

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,  महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ दर्शना बाबर देसाई,  चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी गावडे, महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी,  अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस,सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.