परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे - देवीचीवाडी शाळा द्वितीय..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 07, 2023 15:39 PM
views 214  views

देवगड : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती उपक्रमात देवगड तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता पाहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. ते अधिकाधिक सकस आणि पौष्टिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या परिसरात किंवा आजूबाजूच्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी पालेभाज्या आणि फळभाज्या यांची लागवड आणि संगोपन केले तर पोषण आहारामध्ये या भाज्यांचा वापर करता येईल. मुलांनी स्वतः भाज्यांची लागवड केलेली असल्याने, त्यांना खतपाणी देऊन वाढविलेली असल्याने त्यांच्यामध्ये एक जवळीकता, आपुलकी निर्माण झालेली पाहायला मिळते.

मुलांना स्वकष्टातून निर्माण केलेल्या भाज्यांबद्दल आत्मीयता असते. मुले भाज्या आवडीने खातात. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजण्यास हा उपक्रम खरोखरच उत्कृष्ट आहे. आरे – देवीच्या शाळेने शाळेच्या समोरील मोकळ्या व पडीक जागेवर वाली, वांगी, भेंडे, काकडी, चवळी यांसारख्या भाज्यांची लागवड केली. त्यांना सेंद्रिय खत आणि जीवामृत दिले. त्यामुळे भाज्या जोमदार वाढल्या होत्या. रोजच्या पोषण आहारात त्याचा वापर केला गेला. मुलांना ताज्या व सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या भाज्या खायला मिळाल्या. माकडांचा उपद्रव असतानासुद्धा मुलांनी या परसबागेचे संगोपन केले हे विशेष. यासाठी शाळा व्यव. समिती आणि माता पालकांचे सहकार्य लाभले. शाळेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत आरे आणि पालकांनी कौतुक केले आहे. गटशिक्षणाधिकारी श्री काळे यांनी मुख्याध्यापक श्री. पी. एस. जाधवर, श्री. विवेक कुलकर्णी, श्रीम. कोमल राऊत आणि श्री. जगताप सर यांचे यावेळी कौतुक करण्यात आले आणि शाळेला शुभेच्छाहि देण्यात आल्या.