स्वप्ना गोवेकर लिखित 'काव्यरंग' ला कोमसापचा पुरस्कार जाहीर

Edited by: ब्युरो
Published on: October 16, 2023 21:05 PM
views 90  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 2021 - 22 चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये स्वप्ना गोवेकर यांच्या 'काव्यरंग' या काव्यसंग्रहाला सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे.

     ठाणे, पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्ट्यातील एकूण 67 शाखांमधून हा पुरस्कार सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील युवा कवयित्री स्वप्ना गोवेकर यांना जाहीर झालेला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम अशा स्वरूपात असणार आहे. 

       अनेक मान्यवर व्यक्तींकडून 'काव्यरंग' या पुस्तकाचे कौतुक झालेले आहे. विविध भावभावनांचे नाजूक हेलकावे घेणारा हा काव्यसंग्रह मानवी जीवनाच्या विविध अंगांना अगदी लडिवाळपणे स्पर्श करण्यास यशस्वी होतो. कवयित्रीची प्रगल्भता या कवितांमधून दिसून येते. याचीच दखल घेत को. म. सा. प. च्या वतीने युवा कवयित्री स्वप्ना गोवेकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

         सर्व स्तरांतून यासाठी कवयित्रीचे व पुस्तकाचे कौतुक होत आहे. लवकरच रत्नागिरी येथे होणाऱ्या सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल अशी माहिती आहे.