कसालात रेल्वे स्थानक व्हावं

संघर्ष समितीने वेधलं केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं लक्ष
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 04, 2024 17:40 PM
views 320  views

कुडाळ : कसाल येथे रेल्वे स्थानक मंजुर करणे यावे अशी मागणी कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती कसाल यांच्या वतीने गुरुवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली यावेळी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समिती अध्यक्ष संतोष कांदळगावकर, उपाध्यक्ष संजय वाडकर, कसाल सरपंच राजन परब, यावेळी उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गांव कसाल हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवतीं ठीकाण असून कोकण रेल्वे स्थापनेच्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण करून प्रसिध्द केलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीमध्ये कसाल रेल्वे स्थानक मंजुर करण्यात आले होते. मात्र कसाल रेल्वे स्थानक उभारणी संबंधित कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. सन १९९८ ते आतापर्यत कसाल रेल्वे स्थानक मंजुर होणेकरीता तत्कालीन रेल्वे मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आली. पण मडगांव वरून मुंबईच्या दिशेने जाताना सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकापासून कसाल रेल्वे स्थानकासाठी प्रस्तावित केलेली जागा ही ४ कि.मी. अंतर असून ते रेल्वे सुरू होणेकरीता लागणारे इंधन रेल्वे प्रशासनाला परवडणारे नाही असे कळविण्यात आले. मात्र आता मुंबई ते सिंधुदुर्ग रेल्वे मार्गावर विद्युतिकरण झाले असून इंधनामूळे होणाऱ्या तोट्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कसाल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठीकाण असून कणकवली, कुडाळ, मालवण या तीन्ही तालुक्यांना सहज प्रवास करता येतो. त्या शिवाय कसाल गावातून तारकर्ली, मालवण, आंगणेवाडी, जलमंदीर बिळवस या सारख्या अनेक पर्यटनस्थळी कसाल गावातूनच प्रमुख रस्ता जातो. कसाल रेल्वेस्थानक मंजुर झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नंबरची प्रवास सेवा देणारे एकमेव रेल्वे स्थानक ठरू शकते. त्या शिवाय कळसूली- दिंडवणेवाडी येथील धरणाचा बाराही महिने कसाल मध्ये येणाऱ्या नदीत पाण्याचा विसर्ग केला जातो. याचा फायदा पाणी दुष्काळच्यावेळी रेल्वे प्रशासनाला होऊ शकतो. व पर्यटन स्वयंरोजगारास चालना मिळू शकते या सर्व बाबींचा विचार करावा या सोबत आजुबाजूच्या गावांना फायदा होणार आहे. अशा सर्व ग्रामपंचायत मासिक ठराव / ग्रामसभा ठरावाची प्रत व कसाल रेल्वे स्थानक समर्थनार्थ सुमारे १३५० पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे सह्यांसहीत आपल्याला निवेदन सादर करत आहोत.  कसाल रेल्वेस्थानक मंजुर करण्यासाठी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.