
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या विषय समिती व सभापतीपदाच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या समित्यांच्या सभापती पदी पुन्हा एकदा भाजपा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याच विश्वासू आणि कार्यक्षम नगरसेवकांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टर्मचा कालावधी संपल्याने पुन्हा निवडी होऊनही त्याच नगरसेवकांची सभापती पदी निवड कायम ठेवत चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने विश्वास कायम ठेवला आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडे आल्यानंतर नितीन मनेरिकर यांची गटनदीपदी निवड करण्यात आली होती. या नगरपंचायत च्या पहिल्या टर्म ची मुदत संपल्यानंतर सोमवारी सावंतवाडीचे प्रांत तथा पिठासीन अधिकारी जयकृष्ण फड व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या उपस्थतीमध्ये पार पडली.
या निवडीत भाजपचे गटनेते तथा नगरसेवक नितीन मणेरिकर यांची बांधकाम सभापतीपदी तर उपनगराध्यक्ष देविदास गवस यांची पाणीपुरवठा व बाजार समिती सभापतीपदी, सौ. गौरी मनोज पार्सेकर यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदी आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. ज्योती रमाकांत जाधव यांची बिनविरोध निवड करणेत आली आहे.