
दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार कसई- दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयात स्वतंत्र सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत याबाबत नुकतीच नगरपंचायत कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार कसई-दोडामार्ग नगरपंचायतकडून महिला लाभार्थ्यांसाठी सोमवारी ०८ जुलैपासून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नगरपंचायत कार्यालय व शहरातील अंगणवाडी केंद्रावर मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून नगरपंचायत कार्यालय आणि शहरातील अंगणवाडी सेविका सौ. रिया राजन साळकर (मो. नं. ८९७५४८४१३५), सौ. नम्रता नरसिंह गावडे (मो.नं. ७५०७३४८१५४), श्रीम. दीपिका दिलीप कुबल (मो. नं.९७६७४८६८१५), सौ. श्रीशा श्रीकांत राणे (मो.नं.७५०७३४८१५४), सौ. श्रद्धा शेखर फाटक (मो.नं. ७५८८३६४४१३) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा महिलांना लाभ घेता येणार आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेकरिता कसई-दोडामार्ग शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.
प्रशासनाला सहकार्य करून महिलांना मदत करणार : चेतन चव्हाण
मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कार्यान्वित केलेला हा कक्ष शहरातील महिला वर्गासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचायतकडून महिला लाभार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अगदी लोकाभिमुख सेवा या कक्षातून देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असून प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.