कसई - दोडामार्ग नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे !

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची यशस्वी शिष्ठाई
Edited by: संदीप देसाई
Published on: April 19, 2023 08:55 AM
views 128  views

दोडामार्ग : दोन महिन्यांचे मानधन मिळाले नसल्याने मंगळवारी सकाळपासुन कसई दोडामार्ग नगरपंचायतमधील सफाई कर्मचारी व नळ कामगार कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या यशस्वी शिष्ठाईमुळे स्थगित करण्यात आले. येत्या आठ दिवसात मानधन अदा करण्याचे ठाम आश्वासन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी कर्मचारी यांना चर्चा करून दिल्याने कर्मचारी आपल्या दैनंदिन कामावर रुजू झालेत.

   


बत आंदोलक कर्मचारी यांनी निवेदन देत, माहे फेब्रुवारी २०२३ ते माहे मार्च २०२३ पर्यंतचे मानधन झालेले नाही. गेले दोन महिने आम्ही नगरपंचायत कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला. पण कार्यालयाकडून त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही. मानधन न मिळाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आम्ही आज १८ एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारात आहोत. तरी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर मानधन मिळावे अशी मागणी कर्मचारी भैरू गावडे, रामदास शेळके, बाबू ताटे, सोमनाथ वरक, अरुण चव्हाण, अंकुश कदम, सुनील आरोसकर, मंदार चव्हाण, वामन पालकर, प्रणाली शेटकर, सूचन खरवत, संदेश कोरगावकर, भोजराज दळवी यांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती.

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सकाळीच या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसात तुमचे मानधन अदा केले जाईल त्यामुळे तुम्ही कामावर रुजु होऊन आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. नगराध्यक्ष यांच्या विनंतीला मान देत अखेर कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेत आपल्या कामास सुरुवात केली आहे.