
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मृत्यूशय्येवर असून वैद्यकीय सुविधांअभावी अनेकांना उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. कारिवडे येथील युवक परशुराम पोखरे याचा अपघात झाल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या कुचकामी वैद्यकीय सेवेच्या निषेधार्थ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात शासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले, याबाबत संबंधितांना जाग आणण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी कारिवडे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन कारिवडे ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सादर केले. दरम्यान या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासोबत कारिवडे ग्रामस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सावंतवाडीत मल्टीस्पेशालिस्ट इस्पितळ व्हावे, तसेच उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे नेहमी गोव्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे याचा सरकारने गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी कारिवडे ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीत यशस्वी तोडगा न निघाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.