
कणकवली : डामरे येथील श्री देव पाचोबा देवस्थान येथे गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला श्रीरामनवमी उत्सव २०२६ मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. उत्सवाची सुरुवात सकाळी सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सायंकाळी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सायंकाळी श्री सद्गुरू वारकरी दिंडी भजन, कुडाळ यांचे सुरेल भजन झाले. त्यानंतर शिवप्रेमी वारकरी दिंडी भजन, गवाणे यांच्या वतीने भक्तिमय भजन सादर करण्यात आले. रात्री नादबंधन ग्रुप कणकवली आयोजित संगीत भजन जुगलबंदी कार्यक्रमात बुवा श्री. चिन्मय सावंत, बुवा श्री. रोहित सरनोबत व बुवा श्री. जयेश घाडी यांनी सुंदर भजन सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच या उत्सवाच्या निमित्ताने रामनवमी उत्सव रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या उत्सवाला आमदार मा. निलेश राणे यांनी सदिच्छा भेट देत देवदर्शन घेतले. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांसाठी मोफत लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा लाभ घेतला. हा उत्सव श्री देव पाचोबा मित्रमंडळ, डामरे – फोंडाघाट यांच्या वतीने यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.












