पोलिसांनी पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नाहीत

माजी आमदार परशुराम उपरकरांची टिका
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 26, 2026 18:42 PM
views 59  views

कणकवली‌ : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नसल्याचे दिसून येत असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा करत होते. अशांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवैध धंदे बंद न झाल्याने आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीत तफावत दिसून येत आहे.

आमदार निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात मोठा गौफ्यस्फोट केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू कारखाना सुरू असून अमली पदार्थांची विक्री लहान मुलांकडून केली जात असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. मात्र पोलीस मुळापर्यंत पोहोचत नाहीत, असेही ते म्हणाले. अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी नमूद केले. या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केल्याबद्दल निलेश राणे यांचे उपरकर यांनी अभिनंदन केले.‌आमदार नीलेश राणेंनी अवैध धंद्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या घोषणा या केवळ दिखाव्यासाठी राहू नयेत, असेही उपरकर म्हणाले.