
कणकवली : गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत बब्बल प्रिंट आर्ट कार्यशाळा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी रंगांच्या बुडबुड्यांपासून क्रिएटीव्ही चित्रे रेखाटून आपल्यातील कल्पकता अन् सृजनशीलता दाखवून दिली. गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी विविध विषयांवर पहिली ते नववीपर्यंत मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. याच उपक्रमांतर्गत रविवार २८ रोजी गोपुरी आश्रमाच्या गणपतराव सावंत सभागृहात बब्बल आर्ट कार्याशाळा घेण्यात आली. यात पहिली ते नववीपर्यंत शिक्षण घेणारे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. बब्बल प्रिंट आर्ट कसे रेखाटायचे याबाबत चित्रकार नरेंद्र राणे, मनाली सुद्रीक यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंग तयार करून स्ट्राद्वारे बब्बल तयार करून कागदावर चित्रे रेखाटली. ही चित्रे रेखाटून त्यांनी आपल्यातील क्रिएटीव्हीचे दर्शन घडवले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे संदीप सावंत, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे आदी उपस्थित होते. नरेंद्र राणे, मनाली सुद्रीक यांनी विद्यार्थ्यांना बब्बल प्रिंट आर्ट कशाप्रकारे चित्रे काढायाची आणि चित्रांमध्ये कोणत्या रंगांचा वापर कसा करायचा याबाबत प्रात्यक्षिकेद्वारे मार्गदर्शन केले. स्ट्रॉच्या मदतीने रंगीत पाण्याचे बुडबुडे तयार करून त्यांचे ठसे कागदावर उमटवणे आणि त्यातून चित्र तयार करण्याचे तंत्र त्यांनी शिकवले. कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: काढलेल्या क्रिएटीव्ह चित्राची माहिती उपस्थितांना दिली. बब्बल प्रिंट आर्ट तयार करून बालचित्रकारांनी कलात्मकेचे दर्शन घडविले.
कार्यशाळेची विभागणी तीन गटांत करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बुडबुड्यांच्या ठशांपासून राक्षस, फुलपाखरे आणि फुले यांसारखी कल्पक चित्रे साकारली. पाचवी ते सातवीच्या गटाने कलेचा व्यावहारिक उपयोग करत सजावटीची पाकिटे, शुभेच्छापत्रे आणि बुकमार्क्स तयार करण्यावर भर दिला. तर आठवी व नववीच्या वरिष्ठ गटाने 'लेयर्ड लँडस्केप कोलाज'च्या माध्यमातून प्रगत चित्रकलेचा अनुभव घेतला.










