
कणकवली : लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिपक गंगाराम चौगुले (२७, फोंडाघाट) याची विशेष सत्र न्यायाधीश ओरोसच्याव्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.
१० जुलै २०२४ रोजी पिडीत मुलगी कॉलेजला जाण्याकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत मुलगी वेळेत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद कुटुंबीयांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ११ सप्टेंबर २०२४ रोजी मुलगी पोलिसांना सापडली. तिच्या जबाबानुसार नमूद गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(i), ६९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ प्रमाणे कलम समाविष्ट करण्यात आले. जबाबानुसार चौगुले हा मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने देवगड येथे घेऊन गेला. अल्पवयीन मुलीने नकार दिला असताना देखील आरोपीने शारीरिक संबध ठेवले. तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय ओरोस येथे पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी विशेष सत्र न्यायालय ओरोस यांच्यासमोर पूर्ण झाली. पुराव्याअंती दिपक चौगुले याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.