
कणकवली : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणारा एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. दोडामार्ग तालुक्यातील असलेला हा ४४ वर्षीय तरुण अंध असून तो अन्य काही दिव्यांग बांधवांसमवेत मुंबईला जात होता. हे सर्वजण तुतारी एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होते. गाडी सायंकाळी ७.३० वा. सुमारास कणकवली रेल्वे स्थानकातून सुटून काही वेळ झाल्यानंतर सदर तरुण बोगीमधून बेपत्ता असल्याचे सहकाऱ्यांच्या लक्षात आले. कुणीतरी रेल्वेच्या १४८ क्रमांकावर कॉल केला. त्यानुसार हा तरुण रेल्वेतून पडला असावा अशी शक्यता धरून कणकवली येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी कणकवली ते नांदगाव या परिसरात तरुणाचा शोध घेतला. मात्र तरुण रविवारी सायंकाळपर्यंत सापडून आलेला नाही.










