प्रहरी क्लबचे विद्यार्थी नशा मुक्तीची जनजागृती करणार

कणकवलीत नशा मुक्त कृती आराखडा कार्यक्रमाचे प्रशिक्षण
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 27, 2025 15:23 PM
views 54  views

कणकवली : जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्ग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि व्यसनमुक्ती सल्ला केंद्र वागदे, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत "नशा मुक्त सिंधुदुर्ग" उपक्रमासाठी स्थापित करण्यात आलेल्या प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांना नशा मुक्त कृती आराखडा कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले.

हे प्रशिक्षण कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल हॉलमध्ये पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी भारतीय संविधानातील कलम ४७ चे वाचन करून केले. प्रमुख उपस्थितीत प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. आर. आर. अमृते, प्रा. विजय सावंत, प्रा. एम. जे. कांबळे, प्रा. विनिता सावंत, शिक्षण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, तसेच नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

प्रा. भिसे यांनी आपल्या भाषणात तरुणांमध्ये वाढत्या व्यसन प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रहरी क्लब उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. तर अर्पिता मुंबरकर यांनी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा व गाव नशा मुक्त करण्यासाठी जून ते फेब्रुवारी या कालावधीत विविध जनजागृती उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

या प्रशिक्षणामध्ये देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील हायस्कूलमधील शिक्षक व प्रहरी क्लबचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय सावंत यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.