निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल ७ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 24, 2025 13:08 PM
views 238  views

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दारू वाहतूक करत असलेल्या बोलेरो पिकप वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. महामार्गावरील वागदे येथे शनिवारी करण्यात आलेल्या या कारवाईत ७ लाख २० हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला बोलोरो पिकप टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून तपासाच्या अनुषंगाने त्यांची नावे सांगण्यास एक्साईज पथकाने नकार दिला आहे. जिल्ह्यात सध्या नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांचा कालावधी सुरू असून त्या अनुषंगानेच एक्साईज विभागातर्फे सध्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई सत्र राबविण्यात येत आहे. 

महामार्गावरून गोवा बनावटीची चोरटी दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती एक्साइजच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने महामार्गावरील वागदे हे ठिकाण गाठले. या मार्गाने जात असलेल्या GJ 13 AX 9300 या क्रमांकाचा बोलेरो पिकप टेम्पो पथकाने थांबविला. टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनवटीच्या दारूने भरलेले बॉक्स आढळून आले. कारवाई  राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ.राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त‌विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार, अधीक्षक श्रीम.किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकुर, जवान अजित गावडे, तुषार ठेंबे वाहनचालक हेमंत वस्त सहभागी झाले होते. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.