
कणकवली : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ-पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा उतरविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळपिकांचे हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जून २०२५ पूर्वी फळ-पिक विम्याचे टिगर व नुकसानीची रक्कम जाहीर करून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक होते. मात्र अद्यापपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना फळ-पिक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे आम्ही करणार आहोत. ही रक्कम न मिळाल्यास ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष तथा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.
सतीश सावंत म्हणाले, ३० जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यावर कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनीसोबत बैठक घेणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, तशी कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पुन्हा तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर मागणीबाबतचे पुन्हा निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आश्वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केली नाही. तर भारतीय कृषी विमा कंपनी देखील लोकप्रतिनिधींच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी फळपिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी फळपिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित आहेत. आंबा,काजू रोपांना खत देणे, भर घालणे, रोगांवर औषध फवारणी करणे, बागेतील गवत काढणे ही कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना सदर रक्कम मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आता तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्याकडून आम्हाला व शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत, असेही सतीश सावंत म्हणाले.