
कणकवली : येथील तालुका स्कूलच्या (रा.बा. उचले विद्यामंदिर) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी शाळेत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी मेळाव्या दरम्यान शाळेला मदत जाहीर केली. तर शाळेच्या उन्नतीसाठी आवश्यक गरजा भागविण्यासाठी आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
१६० वर्षे जुन्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शासनाच्या निर्देशांनुसार प्रशालेतर्फे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मुख्याध्यापिका श्रीम. सायली गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मधुरा शिर्के, पालक प्रतिनिधी रेश्मा चव्हाण. शिक्षिका श्रीम. प्रियांका गोवेकर, श्रीम. वर्षाराणी प्रभू, मानसी असरोडकर, साक्षी घाडीगावकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला सर्वांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हटले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका सौ. गुरव म्हणाल्या की, प्रशालेला १६० वर्षे झाली. या काळात हजारो मुलांना प्रशालेने घडविले.
प्रशालेच्या ऊर्जितावस्थेसाठी काही गरजा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण होण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी शाळेच्या देखभाल दुरूस्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा सर्वांसमोर मांडला. शाळेसाठी जमिन सपाटीकरण, शौचालय, पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र खोली आदी सुधारणा करण्यासाठी मदतीची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अशोक करंबेळकर यांनी प्रशालेच्या शिक्षकांनी फक्त पुस्तकी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून मुलांवर संस्कार केल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आजही चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळते. पटसंख्या कमी होण्यामागे इंग्रजी शिक्षणाचा बाऊ करणारे पालकही जबाबदार असल्याचे ते म्हणाले. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. काही गरजा थेट डीपीडीसी निधीतून पूर्ण होऊ शकतात. तात्काळ गरजांसाठी विद्यार्थ्यांनी ठराविक रक्कम जमा करण्याचे निश्चित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित माजी विद्यार्थी अॅड. अभिजीत सावंत, नितीन पटेल, अभिजीत जाधव, सीमा उबाळे, मिलिंद पारकर, निलेश वरवडेकर, परशुराम परब आदींनी मनोगत व्यक्त केले आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. आपल्या शाळेच्या ओढीने परगावी असलेल्या विद्यार्थ्यांनीही या मेळाव्याला आवर्जून उपस्थिती दर्शविली. प्रशालेसाठी आवश्यक मदत उभी करण्यासाठी सर्वांनी निधी उभा करण्याचा मनोदय व्यक्त केला. एका माजी विद्यार्थ्याने कार्यक्रमादरम्यानच प्रशालेत वॉटर फिल्टर देण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन श्रीमती असरोडकर यांनी केले तर साक्षी घाडीगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.